एक निशिगन्ध ओला
बाकी तुझा दरवळ
गालावरची गोड खळी
बाकी माझी तळमळ

कोरीव भुवया उंचावून
तू मात्र सहज बोलतेस
किती सारे आशय माझे
मिठीमध्ये बोलावतेस

म्हणतेस इतकं लिहतोस
समोर बोलत नाही
डोळे वाचलेत का माझे?
त्यातच असतं सर्व काही

माहीत आहे तुला
असले गूढ नाही कळत
हवे असलेले सर्व काही
शब्दांत नाही मिळत

खरं सांग मनापासून
प्रयत्न कधी केलीस का?
मला भेटण्यास तू सुद्धा
शरीरा पलीकडे गेलीस का?

सोड चौकट अडवणारी
आणि अंतरंगात उतरून बघ
कधीतरी तो निशिगन्ध तू
रक्तामध्ये भिनवून बघ.


कवी - निशांत तेंडोलकर