तुझ्या आठवणींना विचार, माझा पत्ता एकदा तरी
त्या तर रोजच येत असतात, दारही न ठोठावता घरी
अगदी हक्काने येतात, राहतात आणि वावरतात
अजुनी इथल्या गोष्टींवरचे, तुझे हक्क सांगतात.
मी सुद्धा तुझ्यासारखे, दुर्लक्ष करतो वागण्याकडे
बऱ्याचवेळी सांगण्यासारखे ,नवीन नसते त्यांच्याकडे
बसतात काही वेळ, आणि मग जुन्या गप्पा मारतात
सवयीने पुस्तकांचे कपाट, अगदी अस्ताव्यस्त करतात
शोधत राहतात गालिबची गझल, नाहीतर विसरलेला फैज चा शेर
कमाल म्हणजे साऱ्या ढिगऱ्यात, त्यांना सुद्धा तो मिळतो अखेर
माझ्या बरोबर किती तरी वेळ, तो गुणगुणत राहतात रात्र-भर
मी सुद्धा आवरत राहतो कपाट आणि आठवणी रात्र-भर
कवी - निशांत तेंडोलकर
फैज अहमद फैझ यांचा शेर -
‘जो न आया उसे कोई ज़ंजीरे-दर
हर सदा पर बुलाती रही रात-भर
एक उम्मीद से दिल बहलता रहा
इक तमन्ना सताती रही रात-भर..’