निश्या तू येतोस की मी जाऊन येऊ?
एक तर सुट्टीच्या दिवशी कुणी कामे काढली की, माझा जीव अत्यंत मेटाकुटीला येतो. अरे सुट्टी ही आराम करण्यासाठी असते. पण मला माहित होते की हा काही मला नेल्या शिवाय ऐकणार नाही. मी नाईलाजाने उठलो आणि आवरायला घेतले. तो पर्यंत हा शेजारच्या रूम मध्ये सिगरेट मारायला गेला.
आमच्या कॉलेजला तशी आढमूठ सारखी बुधवारी सुट्टी असायची. सुट्टीचा काळ असल्याने होस्टेलवर तशी फारशी गजबज नव्हती. त्यामुळे याने मला गावात चल म्हटल्यावर मला नाही म्हणता येणे तसे अवघड होते.
माझे आवरून झाल्यावर आम्ही गावात निघालो. नेहमीच्या कॉलेजच्या बस स्टँडवरून बस पकडली. बस मध्ये आम्ही सेटल होतच होतो इतक्यात बस ने जोरात ब्रेक मारले आणि आम्ही जवळपास सीटमध्ये कोसळलो. कुणीतरी कॉलेजमधील असणार, अचानक हात दाखवून थांबवले असणार. दरवाजा उघडला आणि मानेला एक झटका देऊन तीने केस मागे टाकले… वीणा..
तिने पूर्ण बसमध्ये नजर फिरवली आणि माझ्या बाजूच्या सीटवर तिची नजर खिळली. ती आणि तिची मैत्रीण आजूबाजूच्या सीटचा आधार घेत आमच्या बाजूच्याच पण पलीकडच्या सीट वर येऊन बसली. आणि तिच्या त्या जीवघेण्या अत्तराचा पहिला वार झाला.
कदाचित तिच्या त्या विश्वात मी invisible होतो. पण माझ्या विश्वात…? थोड्या वेळात तीने कानात हेडफोन घालून गाणे ऐकत डोळे बंद केले आणि मगाशी मागे टाकलेल्या केसातील एक खोडकर बट समोर येऊन गालावर विसावली आणि दुसरा वार झाला.
खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याबरोबर ती बट माझ्याकडे झेपावत होती. तिने बंद केलेल्या डोळ्यावरून ती अजूनही जागी आहे का? हे सांगणे थोडे कठीण होते. कारण पापणीच्या आत डोळे हलके हलत ही होते.
तसे म्हणावे तर काहीच घडले नाही, आणि म्हणावे तर खूप काही घडले होते. वेगाने धावणारे जग माझ्यासाठी मंदावले होते. स्टॅण्ड आल्यावर ती उतरून गेली. मी ही मित्रा मागे यंत्रवत चालत होतो. असे जणू की शरीर चालत होते पण मी अजूनही तिच्यासोबत तिच्या बाजूच्या सीट वर होतो.
मित्राला काहीतरी गिफ्ट घ्यायचे होते. त्यामुळे नाईलाजाने त्यासोबत मी ही एका दुकानात शिरलो.. तसा मी तुमच्या प्रमाणे गोड रोमँटिक गाण्यांचा निस्सीम फॅन आहे.
त्यात त्या दुकानदाराने लावलेली प्लेलिस्ट एकदम खास होती . आशाजीं ची. गाणी वेगवेगळ्या काळातील मिक्स होती पण एक से एक रोमँटिक. असे वाटत होते की याने ती स्पेशली बनवली असावी. त्यामुळे एक हलका सुंदर माहोल बनला होता. ते म्हणतात ना की जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा जगातील प्रत्येक प्रेमावरील गाणे हे खास तुमच्यासाठी लिहले आहे असे वाटत असते अगदी तसेच..
‘एक मै और एक तू, दोनो मिले इस तरह और जो तन मन मे हो रहा हैं ये तो होना ही था’
माझ्या मित्राने खुणेने च मला एक पाच मिनिटं म्हणून सांगितले. मला काही प्रॉब्लेम नव्हता म्हटलं ना की माझ्यासाठी वेळ अतिशय स्लो मोशन मध्ये सरकत होता.
‘क्यूँ नहीं, मिलते हैं यार यार से दे मुझे, प्यार का जवाब प्यार से
धड़कनें हुई जवाँ वक़्त भी है महरबाँ फिर ये कैसी दूरियाँ बोलो बोलो बोलो बोलो बोलो’
यानंतर शुssशssशुsssशssशु हे नकळत तुमच्या तोंडातून निघत असेल तर तुम्ही आशा जींचे फॅन आहात. असे काहीसे माझ्या डोक्यात चालू होते. बहुदा फ्रेंडशिप डे जवळ आला असावा कारण त्या दुकानात वेगवेगळ्या रंगाचे ग्रिटींग कार्ड दिसत होते. मी आपले ते मनापासून पाहत होतो. त्यातले एक ग्रिटींग उचलले आणि त्यावरील कविता वाचत होतो.
इतक्यात आशाजीं चे माझे फेवरेट गाणे लागले.
रात शबनमी , भिगी चांदणी तिसरा कोई दूर तक नही ऐसें हाल मे बस और क्या कहे जानम समझा करो..
मी इतक्यात मला मागून धक्का लागला आणि त्याबरोबर एक गोड आवाज ऐकू आला.
Sorry.. !
मी वळून पाहिले तर मला माझाच विश्वास बसेना.. वीणा! काय बोलावे काही सुचेना. ती सुद्धा माझ्याकडे एक मिनिट पाहत होती. मी पूर्ण पणे गोंधळलेला. त्या शांततेतील जागा आशा जींनी भरून काढली
‘सनम, तुमको जिस दिन से देखा हमने, दीवाना दिल क़ाबू में नहीं..! बड़ा प्यारा ये भी इत्तिफ़ाक़ देखो तुम ही मिल जाते हो हर कहीं..!
तुम ही मिल जाते हो हर कहीं, प्यारे आगे ख़ुद ही जान लो, और क्या कहें? जानम, समझा करो
वीणा : excuse me ! तू काही बोललास का?
मी : हो.. म्हणजे नाही. म्हणजे हो मी नाही बोललो काही.
त्यावर ती हसली. माझ्या पोटात खड्डा पडला. ती पुन्हा म्हणाली.
वीणा : तुला धक्का लागला न म्हणून सॉरी.
मी : हो मी पण सॉरी…
एकदम मला माझा बावळट पणा लक्षात आला मी इट्स ओके म्हणण्या ऐवजी सॉरी म्हणालो होतो.
ती पुन्हा हसली.
मी : (सावरून घेण्याचा प्रयत्न करत) म्हणजे मी मध्येच उभा आहे न त्यामुळे सॉरी.
तिने गोंधळून आजूबाजूला पाहिले म्हणून मी पण पाहिले. आणि माझ्या लक्षात आले की, मी दुसऱ्यांदा माती खाल्ली कारण मी दुकानाच्या सर्वात शेवटच्या कॉर्नर ला उभा होतो. ती पुन्हा हसली.
वीणा: ‘इट्स ओके!’
मी: ‘हॅप्पी फ्रेंडशिप डे’ मी हात पुढे केला.
वीणा: ‘हा thanks पण तो रविवारी आहे. आज बुधवार आहे.’
मी: ‘ओह.. एडवान्स.. एडवान्स शुभेच्छा.’
ती पुन्हा गोड हसली आणि हात मिळवला. रोमांच म्हणजे काय हे मी पहिल्यांदा अनुभवले.
पुढे काही बोलावे का हा विचार आला. एक शांतता निर्माण झाली. अर्थात ती शांतता आशा जीं नी भरून काढली.
‘ठहरो, पड़ी है रात ये सारी काहे की जल्दी, जान-ए-मन? डाले हुए ये रेशमी बाँहें यूँ ही लिपटे रहो तुम, गुल-बदन..
तक़दीर से ये मिल गया मौक़ा आगे ख़ुद ही जान लो, और क्या कहें? जानम, समझा करो।’
ती पुन्हा हसली… नाही लाजली कारण हे हसणे इतर हसण्यापेक्षा जास्त मनमोहक होतं. तिने आपला हात अलगद सोडवून घेतला. आणि दुकानातून बाहेर पडली. माझ्यातला DDLJ वाला शाहरूख जागा झाला.
‘निशांत अगर ये भी तुमसे प्यार करती हैं तो मूड जरूर देखेगी.’
ती आणि तिची मैत्रीण पाठमोरी दुकानातून बाहेर पडत होत्या.
मी : ‘पलट’ (no effect) मी : ‘पलट’ (पुन्हा no effect) मी : ‘पलट’
आता मात्र ती…. सरळ रिक्षात बसून निघून गेली. माझा मित्र हळूच कानात म्हणाला.
‘एय गरिबांचा शाहरुख… थोबाड बघितलं का आरश्यात म्हणे पलट.. चल गप’
आम्ही दोघेही त्या दुकानातून निघालो. संध्याकाळी हॉस्टेल ची बस पकडायला स्टॅण्ड वर आलो. बस आधीच लागली होती. आम्ही बसमध्ये चढलो आणि सीट शोधू लागलो. तोच काळजाचा ठोका पुन्हा चुकला. वीणा तिथेच होती. आख्या बस मध्ये दोन च सीट रिकाम्या होत्या. एक थोडी मागे आणि दुसरी वीणाच्या बाजूला.
मित्राने शिताफीने मागची जागा पटकावली. मला काय करावे कळेना. तो तिथून माझ्याकडे पाहून दात काढत होता. मी तसाच उभा होतो. वीणा ने आपल्या कानातील हेडफोन काढले आणि मला म्हणाली,
‘Excuse me! You can seat here’
मी नाईलाजाने तिच्या शेजारच्या सीटवर बसलो. तीने पुन्हा हेडफोन लावले.
काही बोलू का? नको परत माती खाईन.
बस ने वेग धरला तसे ती झोपून गेली. माझी मात्र अवस्था फार विचित्र होती. तिच्या बाजूला खिडकी असल्याने त्याबाजूने एक मंद सुगंध मला येत होता. मी अंग चोरून शेजारच्या सीटवर बसलो होतो. येताना तिने जसे डोळे मिटले होते तसे आताही म्हणजे सांगणे कठीण की ती झोपली आहे की जागी आहे. डोळे पापणीच्या आत हलत होते. मधूनच ती हलकेच हसत असावी.. म्हणजे मला तर तसा भास होत होता. तीने जे हेडफोन लावले होते त्यातून आवाज मला ऐकू येत होता. तिला हाय volume वरच गाणी ऐकायची सवय असावी बहुदा.
‘तुम आये तो आया मुझे याद गली मे आज चांद निकला..’
ती खिडकीच्या बाजूला बसली होती. वाऱ्यामुळे तिचे केस चेहऱ्यावर यायचे जे ती मधून बाजूला करत होती. मी नकळत तिच्याकडे पाहत होतो. इतक्यात ती डोळे उघडून हळूच बोलली.
‘तुला बाहेर बघायचं असेल तर मी इकडे बसू?’
मी एकदम बावचळलो. तशी ती हसली आणि पुन्हा डोळे मिटून गाणे ऐकू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक मंद हास्याची लकेर होती. आता मी तिच्याकडे पाहू शकत नव्हतो. मनात चलबिचल होत होती. आता आमच्यात फक्त जोडणारा धागा म्हणजे हेडफोन वरून ऐकू येणारे गाणे…
आज की रात जो मैं सो जाती खुलती आँख सुबह हो जाती
मैं तो हो जाती बस बरबाद मैं तो हो जाती बस बरबाद
गली में आज चाँद निकला..
लेखक - निशांत तेंडोलकर