कॉफी… माझा जीव की प्राण.. कॉफी हे केवळ पेय नाही तर एक भावना आहे. जिभेने नुसती चव घेऊन ‘कॉफी छान आहे’ म्हणणारा, हा जगातील सर्वात अरसिक माणूस आहे असे मी मानतो. कॉफी कशी पूर्ण पंचेंद्रियांनी प्यावी. प्रथम डोळ्यात साठवून घ्यावा तिचा तो डार्क ब्राउन रंग, मग श्वासात भरून घ्यावा तो सुगन्ध, नंतर चमच्याने हलकेच ढवळताना येणारा कपचा आवाज, ती जिभेवर रेंगाळणारी कडवट चव आणि तिच्या वाफेचा उबदार स्पर्श… सारं काही पिऊन घ्यावं अगदी तृप्तपणे…
तो कॉफीचा कप, मी हातात घेऊन, किती तरी वेळ नुसताच ओठांच्याजवळ धरला होता. मला आवडतो तो सुगन्ध आणि गरमगरम कॉफीतून येणाऱ्या उबदार वाफेचा चेहऱ्यावर होणारा स्पर्श..
श्रुती: तू बोलला नाहीस कधी?
मी: कशाबद्दल?
श्रुती: तुला कॉफी इतकी आवडते म्हणून.
मी: हम्म… पण तुला कळलेच ना?
श्रुती: हो.. तुझ्या चेहऱ्यावर काही लपत नाही.
मी शांतपणे तो सुगन्ध उरात भरला आणि पहिला घोट घेतला. ती रेंगाळणारी कडवट चव..
श्रुती: तू नेहमी इतकी स्ट्रॉंग कॉफी का घेतोस? कडवट अशी.
मी: सवय..
श्रुती: कोणाची ? तुझी की तिची?
मी: (उबदार वाफ चेहऱ्यावर घेत) तिची…
श्रुती: अजूनही मिस करतोस तिला?
मी: नाही. पण सवयी लवकर सुटत ही नाहीत ना?
श्रुती: हम्मम. समजू शकते .. पण अरे त्रास होतो तर आपण प्रयत्नपूर्वक लांब राहावे रे… निदान प्रयत्न तरी करावा.
मी: त्रास? (हलकेच हसून) इतकं सोप्प नसतं ग ते. आणि जे नितांत सुंदर आहे ते का बदलायचं? ती म्हणायची की, जीवन हे गाण्यासारखं आहे. त्यात पुढचे शब्द महत्वाचे नाही, तर महत्वाचा असतो तो ठेहराव.. पूर्वी धसमुसळा असणारा मी.. आता बघ… जगणं अगदी मन भरून जगत आहे.. प्रत्येक गोष्ट अगदी रसिकपणे करता आली पाहिजे, अगदी कॉफी पीणेसुद्धा..
श्रुती: पुरे आता तुझी कॉफी ची फिलॉसॉफी.. आधीही ऐकलंय… मला नाही आवडत कडवट कॉफी. मला साखर आणि दूध व्यवस्थित लागते कॉफीत. नको तो ठेहराव वगैरे.. आणि तसही मला आश्चर्य वाटते की, तिला सोडून जाताना काहीच कसं वाटलं नाही?
मी: काय वाटायला हवं होतं? आणि अग बरोबर आहे तीचेही. नव्हतं ते नातं घट्ट तितकं… आणि you know मला तिची हीच गोष्ट आवडायची. ती जे काही वागायची ते अगदी खरं. नाही ओढायच होतं तिला हे नातं. कधी कधी एखाद्या सुंदर तान घेताना तिला समेवर येऊन सोडणं उत्तम असतं.. उगाच खेचू नये.. तसं काहीसं..
श्रुती: मग तू का अजून खेचत आहेस?
मी: हा हा.. (अजून एक घोट) श्रुते… खेचत नाही ग.. तो ठेहराव अनुभवतोय मी…
श्रुती: मला खरंच कळत नाही.. तुला मी प्रपोज केलं म्हणून, आणि केवळ मला दुखवू नये म्हणून, तर तू होकार दिला नाहीस ना?
मी: (हसत) नाही अजिबात नाही. मला तू खूप आवडतेस. तुझी जागा खूप वेगळी आणि खास आहे.
श्रुती: मग माझ्याबरोबर असताना ही तू तिचा विचार का करतोस? मान्य आहे की, तू तिच्याबद्दल मला सर्व सांगितलेस and I do respect your relation. पण मग माझ्यासोबत असताना माझ्यासारखा रहा ना?
मी: (हसत) विषय तू काढलास.. आणि हो माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात, तेव्हा एक जागा बनवतात. त्यामुळे कोणीच कोणाला रिप्लेस करू शकत नाही.. म्हणून तुझी जागा वेगळी तिची वेगळी. Try to enjoy the differences.
श्रुती: हम्म सॉरी… कधी कधी ना.. मला तिचा खूप हेवा वाटतो. ती तुझ्यासोबत फक्त काही दिवस होती, पण त्यात तुझ्या कितीतरी सवयी ती बदलून गेली. नाही! तक्रार नाही, चांगलंच आहे. पण माझ्याकडून अशी एखादी सवय लागल्याचं आठवतंय तुला?
मी: (अजून एक घोट घेत) ती नेहमी म्हणायची जशी कॉफी पंचेंद्रियात भरून प्यावी.. तशी समोरची व्यक्तीही. आपोआप त्या समजायला लागतात आपल्याला आणि नकळत त्यांची सवय लागते आपल्याला.
मी शेवटचा घोट घेतला आणि बाल्कनीत येऊन पाऊस पाहत उभा राहिलो. निश्चल पावसाकडे पाहताना श्रुती कधी शेजारी येऊन उभी राहिली कळलेच नाही. मी तिच्याकडे पाहिले. पावसात पाहत, शून्यात हरवलेली ती… कितीतरी वेळ त्या डार्क कॉफी चा तो कप ओठांजवळ धरून त्याच्या वाफेचा तो उबदार स्पर्श चेहऱ्यावर घेत उभी होती.
लेखक - निशांत तेंडोलकर