बस्ता
‘तुमचं बरं आहे बुआ ‘लव्ह मॅरेज’ !’
हे वाक्य मी आयुष्यात शंभर वेळा तरी ऐकले असेल. लोकांना लव्ह मॅरेज म्हणजे एक सोप्पं समीकरण वाटतं. वपुर्झा पुस्तकात व.पु म्हणतात
‘प्रेम म्हणजे स्वच्छंदीपणा तर लग्न म्हणजे तडजोड’
मी म्हणेन ‘लग्न म्हणजे तडजोड नाही तर चिडचिड’
लग्न ही घटना कितीही सुखावह किंवा रोमँटिक घटना असली तरी, मला ‘बस्ता काढणे’ हे प्रकरण अतिशय जिकीरीचे वाटले होते. मुळात हा माझा नाही, तर बहुतांशी नवरदेवांचा सामाजिक प्रश्न आहे असे मला वाटते. आमच्या काकू ज्योतिषी आहेत. त्यांनी पत्रिका पाहून स्पष्ट सांगितले की ‘मुलगा मेषेचा आणि मुलगी कन्या राशीची. त्यामुळे राशींचे षडाष्टक आहे त्यामुळे कोणत्याही विषयावर दोघांचे एकमत होणे अशक्य’ असे सांगितले आणि मला बस्ता याप्रकरणातून याची प्रचिती आली.
माझे आणि हिचे लव्ह मॅरेज. त्यामुळे माझ्यावर सत्ता गाजविण्याचा अनुभव लग्नाआधीपासून हिच्या गाठीशी होता. बोलणी करताना माझ्या सासू-सासऱ्यांनी आमचा बस्ता आणि मानपान TTMM . असे सांगितले खरे, पण त्याच संध्याकाळी मला फोनवर ‘पप्पा जे काही बोलले ते खर्चाबद्दल, पण तुझ्या ड्रेसची निवड माझ्या पसंदी ने होणार त्यामुळे नको तिकडे पाजळु नको’ असे ठणकावून (तेव्हढे अधिकार फोनवर बोलून तिने आधीच मिळवले होते) असे होणाऱ्या सौ. ने सांगितले.
त्यामुळे मी शांतपणे पुढच्या आदेशाची वाट पाहत होतो. अचानक एक महिनाआधी फर्मान आले की या शनिवार आणि रविवारी आपण कपडे खरेदीसाठी जात आहोत. सुरुवातीला मला हे अतिशय सोप्पे वाटले. तुम्ही म्हणाल ‘अरे त्यात काय? जायचे. आवडते ते कपडे खरेदी करायचे. पैसे द्यायचे. झाले हाय काय नाय काय! ’ . कित्येक सिंगल लोक हे ‘आणि काशिनाथ घाणेकर’ यांच्या स्टाईलमध्ये ‘उस मे क्या है? ’ म्हणतील पण प्रकरणाचे गांभीर्य मी तुम्हाला नीट समजावून सांगतो मग कळेल.
म्हणजे बघा हा, आपण खरेदी ला चाललो आहोत, ते ही आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत (सासू-सासरे सोबत असल्याने रोमान्स तर सोडा इथं सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागते) जी आपल्यावर आधीच पत्नी असल्यासारखा अधिकार गाजवते. त्यात ही एक नाही साधारतः तिच्या ओळखीच्या २० एक स्त्रियांची खरेदी आहे. (ज्या सोबत आलेल्या नाहीत) त्यांच्याशी फोनवर अथवा आपसात चर्चा करून खरेदी केली जाणार आहे. (नशीब त्यावेळी व्हिडीओ कॉल आणि अंबानींचा फ्री डेटा नव्हता नाहीतर मी आज ही सिंगलच असतो असो). त्यानंतर दोन्ही कडच्या सासूबाईंच्या प्रत्येक विधीसाठीच्या साड्या (किमान चार ते पाच प्रत्येकी). त्यात विधीसाठी एकाच पद्धतीची आणि पोत सारखा असलेली पण रंग वेगवेगळा असे काहीतरी सामान्य पुरुषास न सुटणारे कोडे. पुन्हा करवली आणि मंडळींचा अनारकली टाईप ड्रेस की लेहंगा-चोली याचा प्रश्न सुटायचा होता. आणि या सर्वांनंतर आमच्या वागदत्त वधूची लग्नातील प्रत्येक विधीसाठीची एक साडी असा कार्यक्रम होता तो.
वास्तविक कोणत्याही विवाहित पुरुषाला विचारा की ‘घे ग कुठली पण साडी’ अशी म्हणण्याची हिम्मत अगदी घरगुती साडी घेताना होणार नाही. त्यात तिच्या स्वतःच्या लग्नातला शालू किंवा साडी घेताना तर लांबची गोष्ट. आणि या सर्व प्रकारात सर्वात दुर्लक्षित कोणता घटक असेल, तर तो म्हणजे नवऱ्या मुलाचा ड्रेस आणि इतर सर्व पुरुष मंडळींचे कपडे (यात सर्वधर्म समन्याय या उक्तीखाली माझे सासरे ही आले). कारण हे समीकरण काहीसे असे होते की, नवरी मुलगी उठून दिसावी म्हणून इतरांच्या साड्यांपेक्षा तिची साडी खास हवी. मग आधी इतरांच्या साड्या घेऊ मग हिची खरेदी. आणि हिच्या शालूच्या रंगावर शोभेल असा माझा लग्नातला ड्रेस आणि नवरा मुलगा सर्व पुरुष मंडळीत उठून दिसला पाहिजे, म्हणून सर्व पुरुष मंडळींचे ड्रेस आधी मग शेवटी माझा ड्रेस. म्हणजे माझ्या ड्रेसचे भवितव्य हे किती अंधारात होते, ते सुज्ञास लक्षात आले असेलच.
आम्ही पुण्याच्या लक्ष्मी रोड वर साधारणपणे सकाळी 11.30 पर्यंत एकत्र जमलो. लग्न २ जून ला असल्याने आमच्या खरेदीला सूर्यदेवाच्या साक्षीने मे च्या टळटळीत उन्हात सुरुवात झाली. त्याकाळी होम मिनिस्टर या मालिकेतील पैठणी या प्रकाराने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे त्याच ठिकाणी पैठणी घ्यायची ठरली. आमच्या खरेदीचा श्रीगणेशा झाला. सुमारे २-३ तास त्या दुकानाचा सेल्समन आमच्या मंडळी समोर साड्यांचे ढीग घड्या मोडून फेकत होता. त्यातल्या ४-५ साड्या मामी, मावशी, दूरची काकू अशा ‘तत्सम’ किंवा ‘तद्भव’ व्यक्ती साठी बाजूला काढण्यात आल्या. आणि अर्धे पैठणीची कपाटे खाली केल्यावर पैठणी नको जरा वेगळ काहीतरी दाखवा यावर गाडी घसरली.
त्यानंतर अनेक गावांची नावे असलेले एक एक प्रकार समोर आले. जसे की, बनारसी सिल्क, म्हैसूर सिल्क, इरकली, इचलकरंजी, कांजीवरम वगैरे प्रत्येक प्रकारातील वीस-बावीस साड्या उचकटून माझ्या पुढ्यात येऊन पडत होत्या. काही मावशी-त्यांच्या मुली आणि इतरांसाठी बाजूला जात, तर काही ‘छ्या! ही असली आमची मोलकरीण सुद्धा घालणार नाही’ असा जिव्हारी लागणारा अपमान पचवत ढिगात जाऊन पडत. मला प्रश्न हा होता की इथे वेळ काढायचा कसा? कारण गर्लफ्रेंडला मेसेज करून टाईमपास करावं , तर इथं दस्तुरखुद्द तीच साडी निवडत आहे. आजूबाजूचं एखादं प्रेक्षणीय स्थळ पाहावं तर असल्या दुपारी मे च्या उन्हात कोण खरेदीसाठी येते का?
शेवटी ‘होणाऱ्या सौ.’ ला भयंकर आवडणारी आणि मला अजिबात आवडणार नाही अशी राणी कलरची खड्याची साडी तीने ढिगातून बाहेर काढली आणि मला अगदी खांद्यावर टाकून ‘कशी दिसते?’ म्हणून उत्साहाने विचारले. मला काकूंचे बोल पटकन आठवले ‘एकमत होणे कठीण’ पण पहिल्याच वेळी सर्वांसमोर विरोध कशाला म्हणून मी ‘बरी आहे’ अशी तोलून-मापून रिएक्शन दिली. तीने त्यांना किंमत विचारली तेव्हा त्याने सहज सांगितले ‘अठरा हजार’ आणि एकदम माझ्या तोंडातून ‘काहीही’ निघून गेले. तसे सर्व चेहरे माझ्याकडे वळली. आणि मग मी सावरत ही ला म्हणालो ‘काहीही.. पाहू नकोस. आवडली ना घे मग’ आणि ते प्रकरण तिथेच बारगळले. आणि बाजूला काढलेल्या साड्या ‘या ठेवा बाजूला आम्ही चार दुकाने पाहून आलो’ असे म्हणून आम्ही काही न घेता अगदी ‘तद्-अस्तु’ स्थितीत सुमारे 3.30 वाजता बाहेर पडलो.
या दुकानाने आमचा पुरता भ्रमनिरास केला आणि आम्ही इतर किरकोळ दुकानातून नात्याने किरकोळ आणि अंगकाठी ने बऱ्यापैकी भरभक्कम अश्या लेव्हल ४ नातेवाईकांची (म्हणजे नवऱ्यामुलीच्या मामाची मेव्हनी ) अशी खरेदी केली. त्यातल्या काहीजणी आणि काहीजण तर ब्लाउजपीस आणि टॉवेल टोपीत गुंडाळले गेले. मग पुढचा एक दोन तास लेव्हल 3 ची खरेदी यात (मावशी, मामी अशी प्रकरणे होती) मज्जा म्हणजे मी घरातून हिच्याबरोबर शॉपिंग आणि मस्त रोमँटिक लंचचा बेत करून आलेलो त्यामुळे जेमतेम नाश्ता केलेला तेव्हा पोटात कावळे ओरडू लागले होते. पण स्त्री वर्गाची पोटे बहुदा शॉपिंगवर भरली असल्याने त्यांच्यातले कोणीच जेवणाचा विषय काढत नव्हते.
साधारणतः चार वाजता सासूबाई नी ‘अग ते कोणतं दुकान ग अमुकअमुक ने सांगितलेल असे विचारल्यावर’ हिने “अग हा “साड्यांची महाराणी” असे म्हटले आणि माझ्या पोटात गोळा आला कारण या दुकानाची जवळजवळ पुण्यातील प्रत्येक पुरुषाला धास्ती आहे असे म्हणतात. कारण दुकानदार म्हणतो की हे आमचे छोटेसे दुकान आहे, पण हे साफ खोटे आहे कारण ते दुकान नाहीतर स्त्री वर्गासाठी ‘अलिबाबा ची गुफा आहे. यात एकदा का स्त्री आत गेली की ती थेट ६-७ तासाने बाहेर येते. मी तर अशी अफवा पण ऐकली आहे की लग्नाचा बस्ता खरेदीला आत गेलेल्या बायका थेट त्यांचा लग्नाचा मुहूर्त टळल्यावरच बाहेर आल्या. शेवटी काकुळतीला येऊन मी ‘काहीतरी खाऊया का?’ असे सुचवल्यावर माझ्या सासूबाई नी ‘काय ग बिचारा जावई माझा’ अश्या केविलवाण्या तर माझ्या आईने आणि होणाऱ्या सौ. ने ‘हावरट मेला’ आणि बाबा आणि दादानी ‘तूच रे मनातलं ओळखणारा’ अश्या संमिश्र प्रतिसादाने माझ्याकडे पाहिले. आणि आम्ही शेजारच्या हॉटेलात पंजाबी जेवणावर ताव मारला. मी तर जवळपास ओरबाडलेच म्हणा आणि मग ताज्यातावण्या मूड ने आम्ही पुन्हा खरेदीच्या घाण्याला स्वतःला जुंपून घेतले.
लक्ष्मी रोड किंवा भांडारकर रोड यापैकी कोणत्या तरी एक रोडवर (हे सामान्य माणसाला सांगणे अतिकठीण. इतकी जुळी रस्ते आहेत हे) असंख्य वर्ष ही ‘साड्यांची महाराणी’ आपले तीन मजली सिंहासन टाकून बसली आहे. आम्ही त्या गुफेत शिरलो तोच उजव्या बाजूला असंख्य फिल्म स्टार ने शोरूमला दिलेल्या भेटींच्या फोटोची एक अख्खी भिंत आहे.त्यात हेमाजी , रेखाजी, लता दीदी पासून अगदी 90 च्या दशकातील सर्व महत्वाच्या व्यक्ती (त्यानंतर बहुदा साडी नेसणे का प्रकार अभिनेत्री नी मिळून बहिष्कृत केला असावा) मालकाबरोबर आपणास दिसेल. आणि प्रत्येक फोटोगणिक दुकानाचा आणि मालकाचा वाढलेला आकारही आपणास पाहायला मिळेल. ही भिंत पाहून बाहेरचा व्यक्ती कोणीही ‘क्या बात है’ म्हणेल, पण एक चतुर पुणेकर तुम्हाला सांगू शकेल याचा अर्थ असा की, ‘जर आपण या व्यक्तीपैकी कोणी नसाल तर आपण आमच्यासाठी एक शुल्लक आणि नगण्य असे गिऱ्हाईक आहात.‘कारण पुढची दहा ते वीस मिनिटे आम्हाला तुम्ही इथे का उभारला आहात? हेही कोणी विचारले नाही. शेवटी मी उगाच थोडा चीडचीडेपणा केल्यावर एक माणूस ‘इकडे माझ्याबरोबर या’ असे म्हणून आम्हाला काय घ्यायचे किंवा कोणत्या प्रकारची साडी घ्यायची हे न विचारता वरच्या मजल्यावर नेले. बहुदा गिऱ्हाईकाच्या अंगावरचे कपडे आणि राहणीमान यांच्यावरून कोणत्या मजल्यावर या गिऱ्हाईकाला न्यायचे याची परिमाणे ठरली असावीत असो.
तिथे पुन्हा ‘आधीच्या’ दुकानातील घटनेची पुरावृत्ती सुरु झाली. पुन्हा अस्ताव्यस्थ साड्यांचे ढीग, त्यातील काही बाजूला, तर काही अपमानीत होऊन परत ढिगात जमा. एकंदरीत पाचेक तासाच्या द्रविडी प्राणायम प्रक्रियेनंतर आम्ही बिल करून बाहेर आलो. पण अजूनही हिची साखरपुढ्यात घालायची साडी आणि विवाहवेदीवरचा शालू बाकी होता. आनंद एकाच गोष्टीचा होता की, या ‘महाराणी’ ने जवळपास ९० टक्के स्त्री वर्गाची खरेदी संपुष्टात आणली होती. रात्रीचे १० वाजले होते. त्यामुळे सासूबाई आणि मयू दोघेही मुक्कामाला आमच्याकडे राहणार आणि उद्या रविवारी आपण मयूचा शालू आणि इतर पुरुष मंडळींचे (मी धरून) कपडे घेऊ असे ठरले. रात्री ११.३० च्या सुमारास आम्ही जेवण वगैरे करून घरी आलो. ‘देवा मला आता उद्यासाठी सामर्थ्य दे’ अशी मनापासून प्रार्थना करून झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी आमचा मोर्चा पुन्हा लक्ष्मी रोडवर साधारणतः ११:०० वाजताच्या दरम्यान पोहचला.
होणाऱ्या सौ. : आई मी काय म्हणते काल पहिल्या दुकानामध्ये पाहिलेली ती पर्पल साडी काय वाईट होती? आपण कमी करून देतो का बघायचे का? मी : अग पण तो म्हणाला ना १८ हजार शेवट म्हणून मग? होणाऱ्या सौ. : ते कालचे झाले.. तुला नाही कळत रे तू चल बर गूपचूप.
अश्या धमकीपुढे आमचे काय चालणार? आम्ही आपले निमूटपणे त्या दुकानामध्ये परत आलो. पण दुकानदाराने ती साडी कालच गेली असे सांगितले आणि साड्यांचा नवीन स्टॉक आजच आलाय दाखवू का? असे विचारले. यावर कोणती मध्यमवर्गीय स्त्री नाही म्हणेल सांगा? मग तो नवीन स्टॉक आमच्या समोर घडी मोडून पडू लागला.
काल साड्या पाहताना एक लाल रंगाची साडी मला आवडली होती, पण लाल रंग हा आमच्या मंडळाचा नावडीचा रंग. म्हणून मी काही बोललो नाही, पण हळूच त्याची किंमत असलेले लेबल पाहून घेतले त्यावर OYC २३४१३ असे काहीतरी लिहले होते आणि त्याखाली २२३५० असे लिहले होते. तिथे शेजारी साडी दाखवत असलेल्या काकांना मी सहज विचारले.
मी : काय हो यातली किंमत कुठली ? २३ हजार की २२ हजार. काका : (साडी शांतपणे घडी घालत आणि चेहऱ्यावरची घडी ही न हळू देता बोलले ): दोन्हीही नाही. मी : मग हे नम्बर?
काकानी माझ्याकडे पाहिले आणि ‘कशाला हव्यात नसत्या चौकश्या’ असा चेहरा करत उत्तर दिले
काका : तो आमचा पॅटर्न नम्बर आणि युनिट नम्बर असतो. मी : युनिट नम्बर म्हणजे?
काकानी पुन्हा एकदा तसला कटाक्ष माझ्यावर टाकला आणि उलट प्रश्न विचारला काका: नवरदेव काय तुम्ही? मी : (उगाच लाजत) हो म्हणजे.. काका : हम्म तरीच. (तिथल्या एका पोराला ) ए साहेबाना कॉफी पाठव एक. मी : अहो कशाला? राहू दे. काका : असे म्हणता. (पुन्हा त्या पोराला) ए राहू दे रे साहेब नको म्हणत आहेत.
वास्तविक या सर्व गोष्टीत ज्या पोराला त्यांनी कॉफी सांगितली होती तो इंचभर ही हलला नव्हता, पण त्या काकांनी आमचे संभाषण यशस्वीरित्या थांबवले होते. असो हे सांगण्याचा उद्देश हा की सुमारे २ तास नवीन स्टॉक चा ढीग पडल्यावर त्यात कालच्यासारखी लाल साडी येऊन पडली, अर्थात पडल्यापडल्या आमच्या हिने ती तांदळातल्या खड्यासारखी बाजूला केली. मला थोडे कुतूहल वाटले म्हणून price tag (किंवा काल मी जो price tag समजला होता तो) पाहिला तेव्हा मला सेम पॅटर्न आणि युनिट नम्बर दिसला तसे मी दाखवणाऱ्या काकांना बोललो.
मी : काका या पॅटर्न नम्बर चा हाच युनिट आम्ही काल पाहिला.
तसे ते काका गडबडले त्यांना लक्षात आले की आपण जो माल आज आलेला फ्रेश म्हणून आता दाखवत आहोत तो यांनी कालच पाहिला आहे
काका : हो का? मग एव्हढेच पॅटर्न आहेत
असे म्हणून काकांनी आमच्यासमोर शरणागती पत्करली. आमची ही पण ‘आजच आलाय असे सांगून जुन्या साड्या दाखवतात’ वगैरे बोलून यथेच्छ तोंडसुख घेतले आणि आम्ही बाहेर आलो. मला एक वेगळा आनंद झाला होता. काल तुम्ही माझा दिवस खराब केलात आज मी सुरुवात केली.
पुढे कुमठेकर रस्त्यावर अजून २-३ दिग्ग्ज दुकाने झाल्यावर दुपारी ३ वाजता आम्ही पुन्हा त्या पंजाबी जेवण करुन झाल्यावर आम्ही अशीच एक दोन दुकाने अजून पहिली पण एकही शालू हिच्या पसंदीला उतरेना. शेवटी ‘आपण यांचा तरी ड्रेस तरी घेऊ मग नंतर त्याला मॅचिंग असा तुझा शालू घेऊ’ असे ठरले. अर्थात हे मला अनपेक्षित होते त्यामुळे माझ्याकडे यांच्यासारखी दुकानांची लिस्ट नव्हती त्यामुळे खेळात अचानक आपल्यावर राज्य आले की जशी अवस्था होते तशी माझी अवस्था झाली होती.
शेवटी आपल्या अल्पमतीला बाजूला ठेवून, पत्नीच्या इच्छेला मान देत, आणि आपली मान खाली घालून, समोर असलेल्या मोठ्या तीन मजली ‘पेशवाई’ नावाच्या दुकानात गेलो. वास्तविक कापड खरेदी आणि सार्वजनिक निवडणूक या दोन्हीही बाबतीत माझी स्थिती ही सारखी असते. म्हणजे दोन्हीही बाबतीत माझे अज्ञान मला जाहीरपणे मांडण्याची खूप घाई असते. दोन्ही कडे वेगवेगळ्या पक्ष्याचे उमेदवार असतात. आणि मला सर्वच एकापेक्षा दुसरा चांगला वाटतो. बर दोन्ही बाबतीत नीट पारखून निवडून आणलेले उमेदवार कालांतराने आपापल्या क्षेत्रात हात ‘आखडते’ घेतात असो.
मी दुकानात गेल्यावर दुकानदाराने एका मागोमाग असे तीन ड्रेस दाखवले. मला अपेक्षेप्रमाणे तीनही आवडले बाकी त्याने इतर दाखवतो असा आग्रह धरला पण मला ते खरंच आवडले होते एक पाच एक मिनिटाच्या गहन चर्चेनंतर एक मला, एक दादाला आणि एक बाबांना असे तेच तीन ड्रेस खरेदी केले. आमच्या तिघांच्या अंगकाठीसारख्या असल्याने आलटून पालटून वापरता येईल असाही एक विचार त्या मागे होता. त्यातला जो महागडा तो माझा विवाह वेदीवरचा इतके साधे गणित होते. आम्ही साधारणतः चार वाजता ‘पेशवाई’ दुकानात गेले होतो आणि तीनही ड्रेस घेऊन आम्ही बिल करून साडे चार वाजता बाहेर आलो. ते नाही का मोठी मुले क्रिकेट खेळत असताना लहान मुले मध्ये मध्ये लुडबुड करतात म्हणून आपण त्यांना पाच मिनिटे बॅटिंग देतो आणि मग पुन्हा फिल्डिंगला उभे करतो तसे काहीसे मला वाटले. यांची शालू खरेदीची टेस्ट मॅच काही केल्या संपत नव्हती म्हणून मध्ये आमची T20 आम्ही उरकून घेतली. जाताना दुकानदाराने त्यांचीच एक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ‘पेशवाई’ स्त्री दालन असल्याचे सांगितले आणि जर शालू घेतला नसेल तर तिथे पहा असा सल्ला दिला.
आता इतकी दुकाने पहिले त्यात अजून एक, म्हणून आम्ही ‘पेशवाई’ स्त्री दालन मध्ये शिरलो आणि त्यांनी आम्हाला वरच्या मजल्यावर नेले. तिथे पुन्हा पहिला पाढा सुरु झाला. आणि अचानक ‘तथास्तु’ मध्ये मयूला आवडलेली साडी त्यांनी गठ्ठयातून आमच्यासमोर टाकली. स्त्री वर्गाने एकमुखाने ती साडी हीच आहे असे सांगितले. आता संपूर्ण स्त्री वर्गाचे एकमत व्हावे हा खूप दुर्लभ योग्य असतो. त्या आधीच्या दुकानामध्ये मध्ये याची किंमत १८ हजार सांगण्यात आली होती, पण इथे त्यांनी ती १२ हजार सांगितली, आणि मला बाकी काही माहीत नाही पण हा दुकानदार खूप विश्वासू आहे असे वाटू लागले. मला वाटले की शालू शोध संपला, पण नाही कारण तो रंग अचानक होणाऱ्या सौ. ना भडक वाटू लागला. आणि पुढच्या काही क्षणात ती साडी रिजेक्टड साड्यांच्या गठ्ठ्यात जाऊन पडली.
अशाच एक दोन तासांच्या तपश्चर्येनंतर मयू ला प्रचंड आवडणारी आणि मला ‘ठीक आहे चालेल’ अशा कॅटेगरीमधील साडी आम्ही निवडली आणि साधारणतः ७ वाजताच्या दरम्यान आम्ही सर्व कपडे घेऊन बाहेर आलो. म्हटले झाले. पण नाही अजून माझा फेटा आणि पायातली मोजडी राहिली होती अजून एक दोन तासाची पायपीट करून मोजडी आणि फेटा मिळवला आणि आमचा संपूर्ण बस्ता काढून रात्री अकरा वाजता आम्ही घरी परत आलो. तेव्हा होणारी सौ म्हणाली
होणाऱ्या सौ. : तुला आज खूप पायपीट झाली ना? मी : (उगाच कशाला rude व्हावे म्हणून) अग एव्हढे काय ठीक आहे. होणाऱ्या सौ. : (लाडात येत) ऐक ना पुढच्या वीकेंडला काय करतोस ? मी : (स्वगत : मन मे लड्डू फुटा? वाले एक्सप्रेशन) काही नाही का ग? होणाऱ्या सौ. : आपण तुळशी बागेत जायचे? रुकवताचे सामान घ्यायचे आहे. तिथे मस्त मिळते म्हणे अरे.
आता बाकी सुज्ञ पुणेकरांना ‘तुळशीबाग’ हा अध्याय म्हणजे काय हे सांगायला नको. कारण त्याची असंख्य पारायणे त्यांनी सपत्नीक केली आहेत. बाकी तुमच्यासारखं मी नवरामुलगा असूनही आता मलासुद्धा आता खरंच कळत नव्हतं की मी मुलाकडून आहे मुलीकडून.
लेखक - निशांत तेंडोलकर